वृत्तसंस्था : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा नव्या प्रकल्पासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. निलेश साबळे यांनी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर करत “काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!” अशी घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये निलेश स्वतः झळकत असून, नेमका कोणता नवा कार्यक्रम किंवा मालिका येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे झी मराठीच्या प्रेक्षकांमध्ये आणि विशेषतः ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा ‘चला हवा येऊ द्या’चा नवा सीझन असेल की पूर्णपणे वेगळा शो, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये निलेश साबळे यांनी “आता या पोस्टला ‘शक्तिमानचं’ म्युझिक का?… म्हणूनच तर हा शो मॅड आहे…!!! लवकरच…!!!” असे लिहिल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने “हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे…” अशी कमेंट करत ‘चला हवा येऊ द्या’च्या आठवणींना उजाळा दिला, तर दुसऱ्याने “दादा… ओढ लागे जीवा” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आणखी एका चाहत्याने “दादा, तुमच्या शिवाय झी मराठीमध्ये मजाच नाही. लवकर ‘चला हवा येऊ द्या’सारखं काहीतरी भन्नाट घेऊन या,” अशी भावना व्यक्त केली. निलेश साबळे यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या नव्या शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, या रहस्याचा उलगडा लवकरच होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

