वृत्तसंस्था : अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘फुलवंती’नंतर आता ‘गौरी’ या नव्या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा निर्माती आणि अभिनेत्रीच्या दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. एनएच स्टुडिओज आणि शिवोहम क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे पोस्टर दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले असून, चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदिनाथ एम. कोठारे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘गौरी’मध्ये एका महिलेच्या संघर्षाची, नातेसंबंधातील गुंतागुंतीची आणि न्यायासाठीच्या लढ्याची कथा मांडण्यात येणार आहे. महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेल्या साथीतून सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी महिलाकेंद्रित विषयामुळे ‘गौरी’बाबत उत्सुकता वाढली आहे.
दिग्दर्शक आदिनाथ एम. कोठारे यांनी ‘गौरी’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत याआधी फारसा हाताळला न गेलेला विषय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. एका मुलीचा संघर्ष, तिचे नातेसंबंध आणि न्यायासाठीची धडपड नव्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर आणली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ हा निर्माती म्हणून महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगत, ‘गौरी’ ही प्रत्येक स्त्रीने अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारी कथा असल्याचे नमूद केले. स्त्रीने घेतलेला ठाम निर्णय समाजात मोठा बदल घडवू शकतो, हा संदेश चित्रपटातून दिला जाणार असल्याचे ती म्हणाली. नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत, प्राजक्ता माळी आणि श्वेता माळी हे चित्रपटाचे निर्माते असून, महिलांच्या सशक्तीकरणावर भाष्य करणारा ‘गौरी’ पुढील वर्षी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
