मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणारी मुंबई मेट्रो-1 ही शहरातील सर्वाधिक वर्दळीची आणि प्रवाशांची पसंतीची मार्गिका मानली जाते. दररोज सुमारे पाच लाख प्रवासी या मार्गिकेचा वापर करत असून सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. विशेषतः घाटकोपर ते अंधेरी या दरम्यान प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने कमी अंतराच्या विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या फेऱ्यांमुळे गर्दीवर नियंत्रण मिळवून प्रवाशांना अधिक जलद आणि सुलभ सेवा देण्याचा उद्देश होता. त्यासाठी दोन वेळा यशस्वी चाचण्याही घेण्यात आल्या. मात्र चाचण्या यशस्वी होऊनही या विशेष फेऱ्या अद्याप नियमितपणे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. याबाबत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने स्पष्टीकरण देताना सध्या मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रवासी संख्येत काहीशी घट झाली असल्याने विशेष फेऱ्या काही दिवसांनी सुरू करण्यात येतील, असे सांगितले आहे. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी अपेक्षित असलेली ही सुविधा तातडीने उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रोजच्या गर्दीमुळे प्रवाशांकडून या निर्णयाची लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
सध्या मेट्रो-1 मार्गिकेवर चार डब्यांच्या गाड्या धावत असून वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत ही क्षमता अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. गर्दीच्या वेळेत डब्यांमध्ये उभे राहण्यासाठीही जागा मिळत नसल्याने चार डब्यांऐवजी सहा डब्यांच्या गाड्या सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे हा प्रस्ताव अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार मेट्रो-1वरील एकूण प्रवाशांपैकी सुमारे ८८ टक्के प्रवासी दररोज घाटकोपर ते अंधेरी या दरम्यान प्रवास करतात. अंधेरीनंतर वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमधील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने प्रशासनाने केवळ घाटकोपर-अंधेरी दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२५ मध्ये या सेवेसंदर्भातील चाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि एप्रिल २०२५ मध्ये काही काळासाठी या विशेष फेऱ्या सुरूही करण्यात आल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे त्या काही दिवसांतच बंद करण्यात आल्या. आता पुन्हा एकदा यशस्वी चाचण्या पूर्ण होऊनही अंमलबजावणी रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष फेऱ्या लवकर सुरू झाल्यास गर्दी कमी होण्यास मोठी मदत होईल आणि लाखो मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी व सुलभ होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

