वृत्तसंस्था : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील ‘बाघा’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले तन्मय वेकारिया यांचा यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या तन्मय यांनी अभिनय क्षेत्रात स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला. मुंबईतील कांदिवली येथे मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या तन्मय यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांचे वडील अरविंद वेकारिया हे रंगभूमीवरील परिचित नाव असल्याने त्यांच्याकडूनच अभिनयाची प्रेरणा मिळाली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. विविध ठिकाणी ऑडिशन्स दिल्या, पोर्टफोलिओ सादर केले, मात्र दीर्घकाळ त्यांना यश मिळाले नाही. बेरोजगारीचा काळ वाढत गेला आणि कुटुंबीयांची जबाबदारीही वाढत होती. अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी चुलत्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला पगार अवघा सातशे रुपये होता. नोकरीसोबतच ते रंगभूमीवर काम करत राहिले, मात्र सुरुवातीची अनेक नाटके अपेक्षित यश मिळवू शकली नाहीत. सततच्या अपयशामुळे त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचाही विचार केला होता.
याच काळात दिलीप जोशी यांनी त्यांना एका नाटकात छोटी भूमिका दिली आणि तेथून त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्यानंतर त्यांना दिशा वाकानी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी गुजराती मालिकांमधून दूरचित्रवाणी क्षेत्रात प्रवेश केला आणि विविध मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. बा बहू और बेबी, साराभाई वर्सेस साराभाई यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत भरू लागल्या. त्यानंतर स्मृती इराणी यांच्यासोबतच्या एका मालिकेमुळे त्यांना अधिक ओळख मिळाली. मात्र ती मालिका संपल्यानंतर पुन्हा काही महिने त्यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. त्याच काळात त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून संधी मिळाली. ‘बाघा’ हे पात्र साकारताना त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातील एका व्यक्तीच्या हावभावांपासून प्रेरणा घेतली. ही भूमिका सुरुवातीला मर्यादित स्वरूपाची असली तरी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने ती कायमस्वरूपी करण्यात आली. पुढे ‘बाघा’ हे पात्र मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय आणि आवडत्या पात्रांपैकी एक ठरले. संघर्ष, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तन्मय वेकारिया यांनी यशाचे शिखर गाठले आणि आज ते लाखो प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
