वृत्तसंस्था : जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅपपैकी एक असलेल्या व्हॉट्सअॅपकडून वापरकर्त्यांसाठी आणखी एक महत्त्वाचे फीचर आणण्याची तयारी सुरू आहे. कंपनी सध्या व्हॉट्सअॅप वेबसाठी व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचरची चाचणी करत असून, हे फीचर लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर कॉल करण्यासाठी स्मार्टफोनवर अवलंबून राहावे लागणार नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरील ब्राऊझरमधून थेट व्हॉट्सअॅप वेब वापरून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करता येणार आहेत. विशेष म्हणजे ग्रुप कॉलिंगची सुविधाही यात समाविष्ट केली जाणार असल्याने मोठ्या स्क्रीनवर मीटिंग, ऑनलाइन वर्ग किंवा कौटुंबिक संवाद अधिक सोयीस्करपणे साधता येणार आहे. या फीचरची मागणी वापरकर्त्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. सध्या या सुविधेची चाचणी बीटा आवृत्तीत सुरू असून, ती लवकरच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी रोलआउट केली जाऊ शकते. अनेकदा वापरकर्ते संगणकावर काम करत असताना अचानक एखाद्याला कॉल करण्याची गरज भासते. अशा वेळी स्मार्टफोन शोधण्याची गरज पडते. मात्र नवीन फीचरमुळे हा त्रास संपणार असून, थेट व्हॉट्सअॅप वेबवरूनच कॉल करता येणार आहेत.
व्हॉट्सअॅपमधील नवीन बदलाबाबत माहिती देणाऱ्या WABetaInfo च्या अहवालानुसार, हे फीचर अलीकडील बीटा आवृत्तीत दिसून आले आहे. सध्या व्हॉट्सअॅपचे स्वतंत्र डेस्कटॉप अॅप वापरणाऱ्यांना व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. मात्र व्हॉट्सअॅप वेबवर ही सुविधा अद्याप उपलब्ध नव्हती. नवीन अपडेटनंतर वेब आवृत्तीतही कॉलिंग फीचर उपलब्ध होणार आहे. या फीचरच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल ३२ जणांना ग्रुप कॉलमध्ये सहभागी करून घेता येणार आहे. वापरकर्त्यांना ब्राऊझरमधून व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल असे स्वतंत्र पर्याय दिसतील. आपल्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडून थेट कॉल सुरू करता येईल. याशिवाय स्क्रीन शेअरिंगची सुविधाही उपलब्ध होणार असल्याने ऑनलाइन मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा शैक्षणिक सत्रे अधिक प्रभावीपणे पार पाडता येतील. व्हॉट्सअॅपची एंड-टू-एंड एनक्रिप्शन प्रणाली या ग्रुप कॉल्समध्येही लागू राहणार असल्याने वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहील. त्यामुळे कार्यालयीन कामकाज, ऑनलाइन शिक्षण, व्यावसायिक संवाद आणि वैयक्तिक संपर्कासाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.
