मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर धडक मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत साकीनाका परिसरातील सॉस उत्पादन करणाऱ्या एका आस्थापनेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या पथकाने साकीनाका येथील खैरानी रोडवरील मे. रती एंटरप्राइजेस या कंपनीवर १६ जून रोजी छापा टाकला. तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेत अन्न सुरक्षा नियमांचे योग्य पालन होत नसल्याचे आढळून आले. तसेच उत्पादनांवरील लेबलिंगमध्ये विविध त्रुटी निदर्शनास आल्या. याशिवाय तयार करण्यात आलेल्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य भेसळीबाबत गंभीर संशय निर्माण करणाऱ्या बाबीही तपासणीदरम्यान समोर आल्या. या पार्श्वभूमीवर एफडीएने तत्काळ कारवाई करत चिली सॉस आणि सोया सॉस या उत्पादनांचा एकूण २ हजार ५१० लिटरचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची अंदाजे बाजारमूल्य ३२ हजार ६३० रुपये इतकी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांचे अधिकृत नमुने घेऊन ते तपासणीसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित आस्थापनेला पुढील आदेश मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीसही देण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) प. रा. सिंगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रसाद सावंत, अभिजीत धनवडे, महेंद्र बांदल, सुदर्शन सुरवसे आणि तुषार शेळके यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा सातत्याने राबविल्या जात असून भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

