मुंबई : मुंबईसह राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ करणाऱ्यांविरोधातही कडक भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांची यापुढे कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधात पाणी तसेच इतर पदार्थ मिसळून भेसळ केल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया करण्यात येत असल्या तरी भेसळीचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बनावट औषधे, गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अवघ्या १५ दिवसांत कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून सुमारे २५० हून अधिक व्यक्तींवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी शुक्रवारी मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात राज्यातील प्रमुख डेअरी चालकांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दुधात पाणी किंवा इतर घातक रासायनिक पदार्थांची भेसळ अजिबात सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. केवळ भेसळ करणाऱ्यांवरच नव्हे, तर अस्वच्छ पद्धतीने दूध हाताळून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. उत्पादकापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत दुधाचा संपूर्ण प्रवास सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार असणे आवश्यक असल्याच्या सक्त सूचना त्यांनी डेअरी चालकांना दिल्या. यामुळे दूध व्यवसायातील नियमभंग करणाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांना तक्रार नोंदविणे अधिक सोपे व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या तक्रार नोंदणी ॲपची राज्यात अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. नागरिकांना टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच jc-foodhq@nic.in या ई-मेलवरही अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी पाठविता येणार आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

