बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील सुमारे १५० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ‘अंबरनाथ बदलापूर स्कूल बस असोसिएशन’ने जुलै २०२६ पासून स्कूल बसच्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आधीच शाळांच्या वाढलेल्या शुल्काचा, गणवेश, पुस्तके, वह्या आणि इतर शालेय साहित्याच्या महागाईचा सामना करणाऱ्या पालकांच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडणार आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभाल खर्चातही मोठी वाढ झाल्याने भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे. वाढत्या इंधन दरांचा परिणाम केवळ सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासावरही होत असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोसंदर यांनी सांगितले की, टायर आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती, वस्तू व सेवा कर (GST), विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये अनिवार्य करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, चालक व कर्मचाऱ्यांची चरित्र पडताळणी प्रक्रिया तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहन फिटनेस चाचणी शुल्कातील वाढ यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कमीत कमी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पालकांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी केवळ १० टक्के वाढ लागू करण्यात येणार आहे. या वाढीनुसार सध्या १,००० रुपये मासिक भाडे भरणाऱ्या विद्यार्थ्यांना १,१०० रुपये द्यावे लागतील, तर १,५०० रुपये भाडे असलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क सुमारे १,६५० रुपये होईल. विशेषतः एकापेक्षा अधिक मुले शाळेत असलेल्या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करावा किंवा प्रशासनाने हस्तक्षेप करून मार्ग काढावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

