मुंबई : १ जून २०२६ पासून देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत झालेली ही सलग सातवी दरवाढ असल्याने हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट चालक तसेच छोटे खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नव्या दरानुसार मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३,०६७.५० रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये हा दर ३,११३.५० रुपये झाला असून डिसेंबर २०२५ मध्ये तो १,५८०.५० रुपये होता. तर कोलकात्यात सर्वाधिक ३,२२४ रुपये दर नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये झालेली वाढ तसेच मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांवर दरवाढीचा दबाव वाढल्याचे मानले जात आहे. दरम्यान, घरगुती ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरगुती सिलिंडरचा दर ९१२.५० रुपयांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या सततच्या दरवाढीचा थेट परिणाम खाद्य व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅसचे दर जवळपास दुप्पट झाल्याने हॉटेल, उपाहारगृहे, चहा-नाश्ता केंद्रे आणि लहान खाद्य व्यवसायांचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे आगामी काळात जेवण, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढू शकतात, अशी शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरही अप्रत्यक्ष परिणाम होण्याची चिन्हे दिसत असून, खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत महिनानिहाय झालेला बदल खालीलप्रमाणे आहे:
• जानेवारी : ₹१११ ची वाढ
• फेब्रुवारी : ₹४९ की वाढ
• मार्च : ₹१४४ ची वाढ
• एप्रिल : ₹१९५.५० ची वाढ
• मे : ₹९९३ ची ऐतिहासिक मोठी वाढ
• १ जून २०२६ : पुन्हा सुमारे ₹४२ ते ₹५४ ची वाढ करण्यात आली आहे
(या वाढीमुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर ₹३,११३.५० वर पोहोचला आहे, जो डिसेंबर २०२५ मध्ये केवळ ₹१,५८०.५० होता)

