मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे व विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा याकरीता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना पूरक पोषण आहार दिला जातो. याअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक पदार्थ म्हणून एनर्जी बार दिला जाणार आहे. चिक्कीप्रमाणे असलेल्या या एनर्जी बारसाठी पालिका १ कोटी ४१ लाख रुपये खर्च करणार आहे.
केंद्र सरकारच्या पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) व १२ ग्रॅम प्रथिने, तर ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनयुक्त भोजन देण्यात येते. मुंबई महापालिकेच्या शाळेतील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा याकरीता बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक पोषण आहार देण्यात येतो. याकरीता मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. मुंबई महापालिकेचे सुमारे ३ लाख ५२ हजार विद्यार्थी असून त्यांना सुटीचे दिवस वगळून ११२ दिवस एनर्जी बारचा पुरवठा केला जाणार आहे. वि्यार्थ्यांसाठी वर्षभरात ३ कोटी ९५ लाखांपेक्षाही अधिक एनर्जी बारचा पुरवठा करावा लागणार आहे. एनर्जी बारमध्ये शेंगदाणे, गूळ, कुरमुरे, बदाम, सोया प्रोटीन, चणे असून व्हॅनिला, चॉकलेट, कॅरेमल अशा तीन स्वादांमध्ये एनर्जी बार दिले जाणार आहेत. पंचवीस ग्रॅमचे दोन एनर्जी बार दिले जाणार आहेत.

