ठाणे : मृत्यू दाखला, जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना क्रमांक ८ चा दाखला असे विविध दाखले ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना घर बसल्या मिळाले आहेत. आतापर्यंत साडेचार हजारहून अधिक नागरिकांनी डोअर स्टेप डिलिव्हरी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या घरपोच सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करुन हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना ८० विभागांच्या ४०२ प्रकारच्या शासकीय सेवा घरबसल्या मिळत आहेत. ग्रामपंचायतींच्या कार्यरत केंद्रचालक यांना ही जबाबदारी दिली असून यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मधील केंद्रचालक यांच्यामार्फत कार्यान्वित आहेत. केंद्रचालक नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात, आवश्यक कागदपत्र स्कॅन करतात आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोहचवले जातात. या प्रणालीवर विविध दाखल्यांसाठी आतापर्यंत ५ हजार ९२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४ हजार ७३६ दाखले घरपोच पोहोचविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.

