वृत्तसंस्था : इटलीमध्ये जॉर्जियो मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरात बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. इटलीच्या सत्ताधारी ब्रदर्स ऑफ इटली पक्षाने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यासाठी बुधवारी (८ ऑक्टोबर) संसदेत एक विधेयक मांडले आहे. या विधेयकानुसार, दुकाने, शाळा, विद्यापीठे आणि कार्यालये यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यात येणार आहे. बुरखा (संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख) आणि नकाब (डोळ्यांशिवाय चेहरा झाकणारा बुरखा) या दोन्ही इस्लामिक पोशाखांवर बंदी घालण्याचा स्पष्ट उद्देश या विधेयकात आहे.
मेलोनी सरकारने या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंडाची तरतूद केली आहे. विधेयकाच्या मसुद्यानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ३०० युरो (सुमारे ₹३०,९५९) ते ३,००० युरो (सुमारे ₹३,०९,५८८) पर्यंत दंड आकारला जाईल. मेलोनी सरकारने या बंदीचे वर्णन “इस्लामिक फुटीरतावाद” (Islamic separatism) विरोधात लढण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून केले आहे. पक्षाच्या एका खासदाराने स्पष्ट केले आहे की, “धार्मिक स्वातंत्र्य पवित्र आहे, परंतु ते आपल्या संविधानाचा आणि इटालियन राज्याच्या तत्त्वांचा पूर्ण आदर करून उघडपणे वापरायला हवे.” हा निर्णय इटलीची सामाजिक एकता मजबूत करेल आणि सांस्कृतिक अलगाववाद उखडून टाकेल, असा दावा मेलोनी सरकार करत आहे.