अंबरनाथ : अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांशेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू करताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला. सध्या येथून पूर्व पश्चिम प्रवासासाठी कोणताही पूल अथवा पादचारी पूल नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भिंत उभारल्यास पूर्वेकडील भागात जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागणार आहे. त्याचा परिणाम मोरिवली गावातून शेजारच्या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, घरकामगार महिला यांना सहन आहे. त्यामुळे आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच भिंत बांधा, अशी ठाम मागणी महिलांनी केली असून त्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाला तात्पुरते माघार घ्यावी लागली.
अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा आणि बि कॅबिन परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागात आता हजारो कुटुंबे वास्तव्यास असून, त्याठिकाणी घरकाम तसेच विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पश्चिमेकडून दररोज हजारो महिला घरकामासाठी या भागात येतात, तर आनंदनगर एमआयडीसीत नोकरी करणारे शेकडो पुरुष, महिला रेल्वे रुळ ओलांडूनच पूर्वेकडील भाग गाठतात. सध्या खुल्या असलेल्या या मार्गामुळे पादचाऱ्यांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. मात्र रेल्वेच्या विकास योजनेतर्गत बांधली जाणारी सुरक्षा भिंत उभारल्यास हा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल.

