ठाणे : जनरल एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या कल्याण पश्चिम जोशी बाग येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयाशी संलग्न महिला महाविद्यालयातर्फे ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील विविध शाळांमधील उपक्रमशील ७० महिला शिक्षिकांना त्यांच्या शिक्षण सेवेतील उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र करनकाल आणि आयुष ॲकेडमीच्या संचालिका आदिती अजय चौधरी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील बहुतांशी शाळांमध्ये पुरूष शिक्षिकांबरोबर महिला शिक्षिकाही अधिक संख्येने विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. या शिक्षिकांमधील अनेक शिक्षिका विविध प्रकारचे विद्यार्थी, शालेय हिताचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता, त्यांची कौशल्ये वाढविण्याचे काम करतात. क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर शिक्षिका आवड म्हणून हे काम करतात. अशा गुणवंत महिला शिक्षिकांचा शिक्षक दिनी सन्मान करावा म्हणून जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.करनकाल आणि आयुष ॲकेडमीच्या प्रमुख आदिती चौधरी यांनी महिला शिक्षिकांच्या सन्मानाचे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले. त्यामधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. डोंबिवलीतील छत्रपती शिक्षण मंडळाच्या श्री. रा. साठे विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या चिटणीस भारती वेदपाठक, मुख्याध्यापिका मंदाकिनी पोखरकर, रेश्मा देशपांडे, निलिमा वैद्य, महिला शिक्षिका मृणाल खेडकर, नितुशा हेडावु, पल्लवी चौधरी, आश्लेषा जाधव, संपदा पोतकर, नयना गवारी, मीनाक्षी शिर्के, उमा देसाई, सुवर्णा मागाडे आणि शिक्षक दत्तात्रय कौल्हे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक शाळांमधील ७० शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

