भाईंदर : सहा फुटाखालील मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याच्या सूचना मिरा-भाईंदर महापालिकेने दिल्या आहेत. मात्र या निर्णयाला भाईंदरमधील मूळ गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेत प्रशासन अडथळा आणत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.
यंदा राज्य शासनाने २१ जुलै २०२५ रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार सहा फुटाखालील मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात शाडू तसेच पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे. त्यानुसार मिरा-भाईंदर महापालिकेने सहा फुटाखालील मूर्ती विसर्जनासाठी शहरात ३३ कृत्रिम तलाव उभारले आहेत. मात्र या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाईंदरमधील राई, मोर्वा आणि मुर्धा गावातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भातील भूमिका गावकऱ्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केली आहे. त्यात सामूहिक आरतीनंतर मूर्ती तशाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. काहीजण या भूमिकेशी सहमत नसले तरी बहुतांश गावकरी कृत्रिम तलावातील विसर्जनाला विरोध करीत आहेत. या गावांत प्रामुख्याने पाच दिवस गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. तर फारच कमी ठिकाणी दीड दिवसाचे गणपती असतात. यापूर्वी या गणेश मूर्तींचे विसर्जन गावातील नैसर्गिक तलावात केले जात होते. मात्र आता प्रशासनाने तलावा शेजारी कृत्रिम तलाव उभारल्यामुळे हा विरोध सुरु झाला आहे.

