ठाणे : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात १ जूलै ते २१ जूलै या कालावधीत डेंग्यूचे तब्बल १३४ तर, मलेरियाचे १०५ रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातले आहेत. ठाणे शहरात डेंग्यू मलेरियाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धुर फवारणी केली जात आहे. तर, या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यु रुग्ण संख्येत वाढ होते. विशेष करुन जून ते ऑक्टोबरमध्ये डासांच्या वाढीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या कालावधीत डेंग्यू मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून आरोग्य यंत्रणांकडून काळजी घेण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून निर्माणधीन इमारती, पंक्चर टायर दुरुस्ती दुकाने, गॅरेज, अशा सर्वांना पालिकेकडून नोटीसा बजावण्यात येतात आणि त्यात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते.

