मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये यंदाचा छठपूजेचा उत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष नियोजन सुरू केले आहे. छठपूजेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला २० हून अधिक छठपूजा समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विविध सूचना आणि मागण्या मांडत प्रमुख पूजा स्थळांवर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानुसार आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. मुंबईतील मढ-मार्वे, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि बाणगंगा या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक छठपूजेसाठी एकत्र येतात. विशेषतः जुहू चौपाटीवर सुमारे पाच लाख भाविक उपस्थित राहत असल्याने तेथे सार्वजनिक स्वच्छतागृहे, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय छठपूजेपूर्वी सर्व चौपाट्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, गिरगाव चौपाटीवर पूजा-अर्चनेसाठी व्यासपीठ उभारावे तसेच आवश्यकतेनुसार विविध भागांत कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, अशा सूचनाही समित्यांच्या प्रतिनिधींनी मांडल्या. पूजेसाठी लागणारे साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही महापालिकेकडे मागणी करण्यात आली.
बैठकीत छठपूजेच्या आयोजनासाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये ‘एक खिडकी योजना’ राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच प्रत्येक पूजा स्थळी समन्वयासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. आवश्यकतेनुसार अधिक कृत्रिम तलाव उभारणे, अग्निशमन दलाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्युत रोषणाई, फिरती स्वच्छतागृहे आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले. इतर प्रमुख सणांच्या वेळी ज्या पद्धतीने महापालिका आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते, त्याच धर्तीवर छठपूजेसाठीही सर्वसमावेशक व्यवस्था केली जाईल आणि कोणत्याही भाविकाची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला भाजप मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, नगरसेवक बाळा तावडे, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध छठपूजा समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. छठपूजेदरम्यान सुरक्षितता, स्वच्छता आणि सुविधांवर विशेष भर देत महापालिकेने व्यापक नियोजन सुरू केले असून, भाविकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

