मुंबई : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सध्या मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एकूण १,४६१ आशा स्वयंसेविका कार्यरत असून त्या अत्यंत अल्प मानधनावर आरोग्य सेवा, लसीकरण मोहिमा तसेच विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण आणि कष्टाचे कार्य सातत्याने करत आहेत. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी या स्वयंसेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, अनेक आरोग्य मोहिमांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेला योग्य सन्मान मिळावा, या उद्देशाने दीपावलीनिमित्त विशेष सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महापौरांनी प्रशासनाकडे केली आहे.
महापौर रितू तावडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळातही आशा स्वयंसेविका नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व १,४६१ आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी ५,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने मंजूर करून त्याबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे स्वयंसेविकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या मनोबलातही वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता महापालिका प्रशासन या प्रस्तावावर कोणता निर्णय घेते आणि बोनस वितरणाबाबत पुढील प्रक्रिया कधी सुरू करते, याकडे आशा स्वयंसेविकांचे लक्ष लागले आहे. दीपावलीपूर्वी हा निर्णय अमलात आल्यास हजारो आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

