मुंबई : मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा अनोख्या खाद्य अनुभवाची संधी उपलब्ध होणार आहे. जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या जुन्या डबल डेकर बेस्ट बसमधील बंद पडलेले उपहारगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे महम्मद अली रोड परिसरात बसमध्ये बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा अनुभव पुन्हा नागरिकांना मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसचे नूतनीकरण करून येथे उपहारगृह सुरू करण्यात आले होते. या संकल्पनेला नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र काही कारणांमुळे हे उपहारगृह नंतर बंद पडले. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून ते पुन्हा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बसची पाहणी करून उपहारगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जे. जे. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून या बसांचा नव्याने उपयोग करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत वापराविना पडून असलेल्या दोन डबल डेकर बसांचा वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापर केला जाणार आहे. एका बसमध्ये आधुनिक स्वरूपाचे उपहारगृह सुरू करण्यात येणार असून दुसऱ्या बसमध्ये वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दोन्ही उपक्रमांसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३० ऑक्टोबरपर्यंत ती पूर्ण करून कॅटररची नियुक्ती केली जाणार आहे. उपहारगृह आणि वाचनालयाचे संचालन करण्यासाठी महापालिकेच्या डोंगरी ‘बी’ विभागातील स्थानिक महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नागरिकांना खाद्यसंस्कृती आणि वाचनाचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. जे. जे. उड्डाणपुलाखालील परिसराचे सुशोभीकरण, पर्यटनाला चालना आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

