मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांनी प्रवासी वाढले. दुसऱ्या तिमाहीत मुंबई विमानतळावरून एकूण १.३४ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. ज्यामध्ये ३७ लाख आंतरराष्ट्रीय आणि ९७ लाख देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई विमानतळावरून दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला एप्रिल महिन्यात ४३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मे महिन्यात यात वाढ होऊन ४७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर, १८ मे रोजी सर्वाधिक म्हणजे एक लाख ६३ हजार १६६ प्रवाशांनी प्रवास केला. तर, जूनमध्ये ४३.९ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई विमानतळावरून दुसऱ्या तिमाहीत एकूण ५९ हजार ७७५ देशांतर्गत आणि २१ हजार ५१९ आंतरराष्ट्रीय विमानाची वाहतूक झाली. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई विमानतळावरून दिल्ली, बंगलोर आणि हैदराबाद येथील प्रवाशांनी सर्वाधिक प्रवास केला. ६९ लाखांहून अधिक प्रवासी विमानतळावरून प्रवास करीत असलेली देशांतर्गत प्रमुख तीन ठिकाणे म्हणून उदयास आली आहेत. तर, दुबई, सिंगापूर आणि लंडन यांनी सर्वोच्च तीन पसंतीची आंतरराष्ट्रीय गंतव्ये म्हणून त्यांचा दर्जा कायम राखला आहे. या तिमाहीत ६ लाखांहून अधिक प्रवाशांनी मुंबई – दुबई प्रवास केला. तर, इंडिगो, एअर इंडिया आणि विस्तारा या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक बाजारपेठेचा वाटा असलेल्या सर्वोच्च विमान कंपन्या म्हणून उदयास आल्या. यंदाच्या तिमाहीत एकूण ४९.९ लाख म्हणजे ५० टक्के प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या विमानामधून प्रवास केला.