मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 10.50 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. गेल्या वर्षासाठी 54256.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिका यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्ट प्रशासन, मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी मोठी तरतूद केली आहे.
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमास 928.65 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलं आहे. तर मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी यंदा 2 हजार 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहिसर टप्प्यासाठी पालिकेच्या वतीनं 2 हजार 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तरतूद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळालं?
-गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 हजार 870 कोटी रुपयांची तरतूद
-मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (वर्सोवा ते दहिसर) साठी 2 हजार 960 कोटी रुपयांची तरतूद
-मुंबईतील पूरजन्य परिस्थीवर नियंत्रण मिळवण्याकरता पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध कामांकरता 1930 कोटी तरतूद
-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना साठी अर्थसंकल्प अंदाजे 23.४46 कोटी इतकी तरतूद
-यंदाच्या आर्थिक वर्षात 6 अतिरिक्त पॉलिक्लिनीक व डायग्नॉस्टिक सेंटर्स सुरु होणार
-तसेत 54 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना सुरु करण्याचे करण्याचा निर्णय
-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखान्यांमध्ये फिजिओथेरपिस्ट आणि कान, नाक, घसा तज्ञांच्या सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार
-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प मुंबई राबवला जाणार आहे. ज्याअंतर्गत मुंबईत अधिकाधिक बांबू वृक्षारोपण करण्याचा पालिकेची विचार आहे.
-याअंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप ते कन्नमवार नगरपर्यंत 178 कोटी रुपयांची तरतूद
-राणीच्या बागेसाठी ७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मगर आणि सुसर यांच्यासाठी अंडर वॉटर प्रदर्शनीचे बांधकाम करण्यात येणार
-हे आशियातील सर्वात मोठी आणि एकमेव प्रदर्शनी केंद्र असणार
-धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसाठी 111 कोटी रुपयांती तरतूद तसेच 18 वर्षांवरील दिव्यांगासाठी अर्थसहाय्य योजना
-ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना
-महिला सुरक्षा अभियान मुंबईत राबवण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेला चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मालमत्ता करापोटी मुंबई पालिकेला 31 जानेवारी 2024 पर्यंत 5400 कोटी रुपयांपैकी केवळ 605.77 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे विकास नियोजन खात्यात जमा झालेल्या महसुलामुळे पालिकेला थोडासा दिलासा मिळाला. चालू वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत 4028.18 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. त्याचबरोबर मुदत ठेवींमधील गुंतवणुकीतून महापालिकेला 2206.30 कोटी रुपये मिळाले आहेत.