उल्हासनगर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या एन्काउंटरविषयी अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. तसेच एन्काउंटर झाल्यानंतर अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करायचे, यावरुन वाद निर्माण झाला होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या दफनभूमीत पुरण्यात आला होता. यानंतर हा सगळा वाद संपेल, असे वाटत होते. परंतु, पोलिसांना आता अक्षय शिंदे याच्या पुरलेल्या मृतदेहाची राखण करावी लागत आहे.
अक्षय शिंदे याच्या कृत्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह आमच्या परिसरात दफन करु देणार नाही, अशी भूमिका बदलापूर आणि उल्हासनगरमधील स्थानिक नागरिकांनी घेतली होती. याविरोधात अक्षयच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने अक्षयचा मृतदेह दफन करण्याची जबाबदारी उचलली होती. अखेर उल्हासनगर येथील दफनभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदे याचा मृतदेह पुरण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांचा रोष लक्षात घेता दफनभूमीतून कोणी पुन्हा अक्षयचा मृतदेह उकरुन बाहेर काढेल, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आता पोलिसांचे एक पथक अक्षयचा मृतदेह पुरलेल्या परिसरात 24 तास पहारा देत आहे.
अक्षय शिंदे यांचा मृतदेह अखेर उल्हासनगर इथल्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला होता. एकंदरीतच अक्षयच्या दफनविधीला विरोध पाहता आता या मृतदेहाभोवती सीसीटीव्हीने नजर ठेवली जात असून पोलीस यंत्रणासुद्धा तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण संपले असले तरी पोलिसांच्या मागे नवे शुक्लकाष्ठ लागल्याची चर्चा आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर अक्षय शिंदे याच्या पालकांनी आमचा मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला होता. शाळेतील काही बड्या धेंडांना वाचवण्यासाठी आमच्या मुलाचा बळी देण्यात आल्याचा आरोप अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी केला होता. यानंतर अक्षय शिंदेच्या पालकांना धमक्या येत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलांनी केली होती. अक्षय शिंदे याच्या पालकांनी आम्हाला उच्च दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणीही केली होती.