मुंबई: बुधवारी दुपारी ४ वाजता नौदलाची स्पीड बोट, ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीला धडकली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी स्पीड बोट चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साकीनाका येथील २२ वर्षीय नाथाराम चौधरी याच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे. नौदलाच्या स्पीड बोटीची धडक बसल्यामुळे ‘नीलकमल’ ही प्रवासी फेरी बोट बुडाली आणि त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलाबा पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंदणी क्रमांक २८३/२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांचा वापर केला आहे. या प्रकरणात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे आरोप केले आहेत. कुलाबा पोलिसांनी काही जणांचे जबाबही घेतले आहेत.
नौदलाने या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, स्वतः नौदल प्रमुख मुंबईत दाखल झाले आहेत. नौदलाच्या स्पीड बोट आणि नीलकमल बोट यामध्ये झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी नौदलाने स्वतंत्र समिती नेमली आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख, ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, या प्रकरणाच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी या दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे.
नौदलाकडून या दुर्घटनेच्या बचाव आणि शोध कार्याची माहिती नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन मेहूल कर्णिक यांनी दिली आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या आठ बोटी आणि हेलिकॉप्टरने बचाव कार्य चालवले आहे. दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण रात्रभर बचाव आणि शोध कार्य सुरू होते.