पुणे : करोना संकटाच्या काळात डॉक्टरांकडून प्रतिजैविकांचा अतिवापर करण्यात आला. अनेक रुग्णांना आवश्यक नसतानाही प्रतिजैविके देण्यात आली. जगभरात सरासरी चारपैकी तीन रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. यामुळे आता प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या जगभरात जाणवू लागली आहे, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ६५ देशांतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ४ लाख ५० हजार करोना रुग्णांच्या आरोग्य अहवालाची तपासणी केली. हे रुग्ण जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीतील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, करोना संकटाच्या काळात रुग्णालयात दाखल झालेल्या केवळ ८ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्याची गरज होती. प्रत्यक्षात डॉक्टरांकडून जगभरात सरासरी ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. पश्चिम प्रशांत विभागात ३३ टक्के रुग्णांना तर आखाती आणि आफ्रिकी देशांमध्ये ८३ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. युरोप आणि अमेरिकेत २०२० ते २०२२ या कालावधीत प्रतिजैविके देण्यात प्रमाण हळूहळू कमी झाले. मात्र, आफ्रिकेत ते वाढताना दिसून आले.
प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर करोनामुळे गंभीर स्थिती झालेल्या रुग्णांमध्ये झाला. जगभरात अशा ८१ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. मध्यम अथवा सौम्य त्रास असलेल्या करोना रुग्णांना प्रतिजैविके देण्याचे प्रमाण विभागनिहाय वेगळे असून, त्यात आफ्रिकेत सर्वाधिक ७९ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रतिजैविके देण्यात आल्याने करोना रुग्णांच्या प्रकृतीत फरक पडला नाही. याउलट जीवाणूसंसर्ग नसलेल्या रुग्णांच्या आरोग्याला त्यामुळे अपाय झाला, असे संघटनेने नमूद केले आहे.