नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी पहाटे चार वाजेपासून ते सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवले जाणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता या काळात महत्त्वाच्या व्यक्तींचे (व्हिआयपी) दर्शन, गर्भगृह दर्शन व देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
महाशिवरात्रीच्या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या काळात नियोजनाची कसोटी लागणार आहे. पुढील वर्षी कुंभमेळा असल्याने गर्दी व्यवस्थापनाची या निमित्ताने रंगीत तालीम करता येणार आहे. यंदा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून वेळेत बदल करण्यात आले आहेत. भाविकांना दर्शनासाठी पूर्व दरवाजा दर्शनबारी येथून प्रवेश दिला जाईल. १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहापर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजातून आधारकार्ड दाखवून मंदिराच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश करता येईल. दर्शन झाल्यावर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून त्यांनी बाहेर पडावे. यावेळी सोबत नातेवाईक अथवा पाहुणे यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे.

