मुंबई : तब्बल १७ वर्षांनी टी २० विश्वचषक जिंकलेली इंडिया टीम आज मुंबईत येणार आहे. मरीन लाइन्स ते वानखेडे स्टेडिएम या मार्गावर टीम इंडियाची मिरवणुक जल्लोषात निघणार आहे. वानखेडे स्टेडिएममध्ये क्रिकेट चाहत्यांना एंट्री सुद्धा फ्री असेल. टीम इंडियाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी खुद्द पीएम मोदींनी खेळाडूंसोबत दिल्लीत स्नेहभोजन समारंभ आयोजित केला. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा टीम इंडियाच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तब्बल १७ वर्षांनी भारताने टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुद्धा खेळाडूंचे स्वागत करण्यात येणार आहे. विधानसभेत आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईकर खेळाडूंच्या स्वागताचा प्रस्ताव मांडला. या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या चौघांचा समावेश आहे. हे चारही खेळाडू मुंबईकर असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सांगितले त्यामुळे पहिल्यादांचा थेट विधानभवनात सीएम शिंदेंच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार होणार आहे, असा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी मांडला.
विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने सर्वपक्षाचे आमदार मुंबईत आहेत अश्यावेळी देशाची मान उंचावली अश्या खेळाडूंचे आपण मनोबल वाढवले पाहिजे यासाठी विधीमंडळाकडून खेळाडूंचा सत्कार व्हावा आणि टीम इंडियाचे प्रमुख रोहित शर्मा खुद्द मुंबईकर असल्याने महाराष्ट्रासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट आहे असे म्हणत सीएम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सत्कार प्रस्तावाचा निवेदन प्रताप सरनाईक यांनी सादर केले आहे. उद्या ५ जुलैला विधीमंडळाच्या परिसरात टीम इंडियाचे कॅप्टन रोहित शर्मा यासह इतर खेळाडूंचा सीएम शिंदे महाराष्ट्र सरकारच्यावतीने स्वागत करतील. भविष्यात आणखी देशाचे नाव उंच करण्याची प्रेरणा खेळाडूंना मिळेल यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधीमंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीएम शिंदे, विरोधीपक्षनेते आणि सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत हा भव्य सत्कार सोहळा उद्या पार पडणार आहे.