वृत्तसंस्था : पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी आली आहे. अभिनेता आणि बॉडी बिल्डर वरिंदर सिंह घुमनचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे. यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. वरिंदरच्या मृत्यूच्या बातमीनंतर एकच शोककळा पसरली आहे. असं म्हटलं जात आहे की वरिंदर अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात त्याच्या दुखापतीसाठी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला होता. तो घरी एकटाच निघून गेला होता. ही एक किरकोळ शस्त्रक्रिया असल्याने तो आज परतणार होता, परंतु अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं.
वरिंदर सलमान खानसोबत ‘टायगर ३’ चित्रपटात दिसला होता. त्याच्या बॉडी बिल्डिंग कौशल्याचं सर्वांनी कौतुक केलं होतं. सलमानचे चाहते त्याच्या शरीरयष्टीने मंत्रमुग्ध झाले होते. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. वरिंदरने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा वरिंदर त्याच्या पर्सनॅलिटीमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. वरिंदरला फिटनेसचं फार वेड होतं. तो “मिस्टर इंडिया २००९” चा विजेता होता. शिवाय, तो “मिस्टर एशिया चॅम्पियनशिप” मध्येही दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. “द ही-मॅन ऑफ इंडिया” म्हणून तो ओळखला जात होता. वरिंदरला अभिनयाचीही आवड होती.