नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (८ ऑक्टोबर) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून तिथे दररोज तब्बल २ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळेच तिथे आता स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळ परिसरात पोलिस ठाणे निर्माण करण्याला मंजुरी दिली असून, या पोलिस ठाण्यासाठी विविध संवर्गांतील एकूण १०८ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पोलिस ठाण्यासाठी तब्बल ४ कोटी रुपये इतक्या खर्चासही सरकारने मान्यता दिली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पनवेल शहर व उलवे पोलिस ठाण्यांच्या हद्दींचे विभाजन करून हे नवीन पोलिस ठाणे स्थापन केले जाणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यात २ पोलिस निरीक्षक, ३ सहायक पोलिस निरीक्षक, ६ पोलिस उपनिरीक्षक, ६ सहायक पोलिस उपनिरीक्षक, २७ हवालदार, ४२ पुरूष पोलिस शिपाई, १९ महिला पोलिस शिपाई आणि ३ चालक पोलिस शिपाई असतील.