वृत्तसंस्था : रिअॅलिटी टीव्ही स्टार शिव ठाकरेनं ‘द ५०’च्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावून, रिअॅलिटी शोच्या विश्वात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. या भव्य अंतिम फेरीत (Grand Finale), त्यानं ‘Faisu’ (फैसू) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फैजल शेखसह इतर बलाढ्य स्पर्धकांना पराभूत करत विजेतेपदाचा करंडक उंचावला. एकाच छताखाली ५० सेलिब्रिटींना एकत्र आणणाऱ्या या शोमध्ये रणनीती, सांघिक कार्य आणि टिकून राहण्याच्या क्षमतेवर भर देण्यात आला होता.
अंतिम फेरीत, शिवनं फैसू, काका, कृष्णा श्रॉफ आणि रजत दलाल यांच्या विरोधात एका कठीण आव्हानात स्पर्धा केली. अंतिम टास्कमध्ये स्पर्धकांना एका चक्रव्यूहातून (Maze) मार्ग काढणे, लहान-सहान आव्हाने पूर्ण करणे, चाव्या गोळा करणे आणि सिंहाच्या चेहऱ्याचा एक कोडा (Puzzle) सोडवणे आवश्यक होते. या टास्कनं स्पर्धकांची शारीरिक ताकद आणि मानसिक एकाग्रता या दोन्हीची कसोटी पाहिली. शिवनं अत्यंत शांतपणे आणि स्पष्ट नियोजनासह कामगिरी केली. फैसूसह सर्वात जलद कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांपैकी तो एक ठरला आणि अखेरीस त्यानं विजेतेपद पटकावले. ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम थेट शिवला स्वतःला मिळाली नाही. शोच्या स्वरूपानुसार (Format), ही रक्कम त्याच्या निवडक चाहत्याला देण्यात आली. शिवचा सर्वात मोठा समर्थक म्हणून निवड झालेल्या सीताराम प्रल्हाद आघाव यांना ही संपूर्ण बक्षीस रक्कम मिळाली, ज्यामुळं हा विजय त्याच्या चाहत्यांच्या वर्गासाठी आणखीच खास ठरला.आपल्या विजयाबद्दल बोलताना शिव म्हणाला, “‘द ५०’ हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता. मला स्वतःची एक वेगळी बाजू जगासमोर आणायची होती, एक अशी बाजू जिचा असा विश्वास आहे की, आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ओरडण्याची किंवा भांडण्याची गरज नसते. तुम्ही मनापासून खेळू शकता आणि तरीही जिंकू शकता.” त्यानं पुढं सांगितलं की, ५० बलाढ्य स्पर्धकांमध्ये राहून विजेतेपद मिळवणे ही अशी गोष्ट आहे जी त्याला आयुष्यभर स्मरणात राहील.

