मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज जप्त करण्यात पुन्हा एकदा यश मिळालं आहे. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतून १५ कोटींचा नऊ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या व्यक्ती एमडी, हेरॉईन, चरस इत्यागी ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती होती. हे ३ आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांसह सात आरोपींना अटक करण्यात तसंच त्यांच्याकडून १५ कोटीं किमतीचा ड्रग्ज आणि साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वरळी, आझाद मैदान आणि आणि कांदिवली कक्षाने सांताक्रुझ, वर्सोवा, कुर्ला, अंधेरी, दहिसर चेकनाका परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या युनिटने शहरात विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या. वरळी युनिटने २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या दरम्यान सांताक्रुझ आणि वर्सोवा परिसरातून चार जणांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून व घरातून पाच किलो ७३५ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज व साडेतीन लाखांची रोकड जप्त केली होती. कांदिवली युनिटने वांद्रे व कुर्ला परिसरात कारवाई करत दोघा तस्करांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींपैकी ३ आरोपी हे राजस्थान, उत्तराखंड आणि गुजरातमधील असल्याची माहिती मिळालीये. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईतून ११ कोटी ४७ लाख किंमतीचा मेफेड्रॉनसह २ कोटींचा ५०० ग्रॅम हिरोईन आणि सव्वा कोटींचा ३ किलो चरस साठ्यासोबत साडेतीन लाख रूपये रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने २४ जानेवारी ते ५ फेबुवारी या काळात सांताक्रुझ आणि वर्सोवा या परिसरात ड्रग्ज विरोधी कारवाईत ४ जणांना अटक केली होती. यापैकी ३ आरोपी न्यायालयीन कोठडीच आहे. या आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.