ठाणे : संपूर्ण देशभरात लूटमार करून दहशत माजवणाऱ्या सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या सराईत चोरट्याला कल्याणच्या आंबिवलीतील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलिसांना हवा असलेल्या या आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आरोपीला पकडण्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यावेळी सलमानच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला करून त्याला सोडवण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरट्याला जेरबंद केले आहे. पनवेलमध्ये सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तपासाला सुरूवात केली.
पोलिसांनी तपास करून आरोपीची ओळख पटवली. सलमान इराणी असे आरोपीचे नाव असून, तो आंबिवली येथील इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. खडकपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय गायकवाड यांचे पथक आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तपणे सलमानला पकडण्यासाठी आंबिवलीतील इराणी वस्तीत दाखल झाले. पोलिसांना सलमान इराणी वस्तीत दिसला. पोलिसांनी आधी त्याला न पाहिल्याचे भासवत अचानक त्याच्यावर झडप घातली. सलमानने पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा जोरदार प्रयत्न केला. याच वेळी सलमानचे नातेवाईक तिथे जमले आणि त्यांनी सलमानला सोडवण्यासाठी पोलिसांशी झटापट सुरू केली. मात्र, पोलिसांनी सलमानच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या इराणी वस्तीत पोलीस पथकांवर यापूर्वीही अनेकदा हल्ले झाले आहे. तरीही पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक चोरट्यांना जेरबंद केले आहे.