नवी मुंबई : लोकनेते दि. बा. पाटील ह्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी भूमिपुत्रांचा आणि दि. बा समर्थकांचा नवी मुंबई विमानतळावर ६ ऑक्टोबर रोजी विराट धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी भिवंडी लोकसभेचे आणि भूमिपुत्रांचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी पत्रकार परिषद घेत नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे आणि तसे अधिकृत नोटिफिकेशन काढून घोषित करावे, अन्यथा सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांचा आणि दि.बा समर्थकांचा विराट असा मोर्चा निघणार, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या फळीचे नेते, कुळ कायद्याची अंमलबजावणी करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कसणार्या शेतकर्यांना जमिनीचे मालक बनवणारे नेते, जमिनीच्या बदल्यात जमीन हा कायदा प्रस्थापित करणारे, नवीन भूसंपादन पुनर्वसन आणि पुनरस्थापना कायद्याची पायाभरणी करणारे नेते, स्त्रिभृण हत्या विरोधी कायदा देशाला देणारे, ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्र आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते, पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार तरी ही स्वतःचे घर न बांधू शकणारी निस्वार्थ व्यक्ती आणि त्यांच्या भूमीत होणार्या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात दिरंगाई होत असेल तर ते कदापी खपून घेतले जाणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे ह्यांनी दिला आहे.