पुणे : रामटेकडी हडपसर भागात घडलेल्या एका घटनेत सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींचा एका सुरक्षारक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. बहादूरसिंग अनंतसिंग मेहता (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलींच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बहादूरसिंग मेहता हा रामटेकडी हडपसर भागातील एका सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करतो. फिर्यादी यांच्या मुली या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत होत्या. यावेळी आरोपी मेहता तिथे आला, त्याने फिर्यादी यांच्या मोठ्या मुलीला जवळ बोलावून तिच्याशी जबरदस्ती करण्याच्या प्रयत्न केला असता तिने सुटका करून घेतली. यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या लहान मुलीला मोबाइल दाखविण्याचे आमिष दाखवून जवळ ओढून उचलून मिठीत घेत तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आदलिंग करीत आहेत.