डोंबिवली : धूम स्टाईलने दुचाकीवर येऊन नागरिकांना लुटणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. वारीस खान (वय २४) आणि मोहम्मद कुरेशी (वय ३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वारीस याच्यावर नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवली पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. वारीस हा सराईत गुन्हेगार असून इराणी वस्तीत चोरट्यांसोबत राहून त्याने हे चोरीचे प्रशिक्षण घेतले आहे. आंबिवली येथील इराणी वस्ती चोरांची वस्ती म्हणून ओळखली जाते असून याच वस्तीत वारीस याची दुसऱ्या टप्प्यातील फळी उदयास येत होती. ही टोळी सक्रिय होण्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मानपाडा परिसरात राहणारे शिक्षक रवी गवळी (वय ४२) हे २० ऑक्टोबरला सकाळी ७ च्या सुमारास डी मार्ट परिसरात मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यानी त्यांना धक्का मारून खाली पाडून त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून पळ काढला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीनुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, सुनील तारमाळे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे त्यात कैद झाले. गुप्त बातमीदार तथा तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी माहिती काढली. २७ ऑक्टोबरला चोरटे चोरटे नवी मुंबई तळोजा मार्गे डोंबिवलीत येत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
मानपाडा पोलिसांनी ताबडतोब निसर्ग हॉटेल समोरील रोडवर साध्या वेशात ३ ठिकाणी सापळा रचला. तळोजा रोड कडून आरोपीची मोटरसायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलिसांनी त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी जड अवजड वाहने रोडवर थांबवली. याचा आरोपींना संशय आल्याने आरोपींनी मोटरसायकल रोडवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आणि दोन्ही आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. वारीस व मोहम्मद यांचा तपास केला असता एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. सोनसाखळीचे ८ तर मोटरसायकल चोरीचा १ गुन्हा यामध्ये उघडकीस आला आहे. रामनगर, मानपाडा, विष्णूनगर, महात्मा फुले चौक, कल्याण तालुका, कोळसेवाडी आदी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १५१ ग्रॅम वजनाचे ८ लाख १८ हजार रुपये किंमतीचे दागिने व मोटारसायकल असा एकूण ८ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याचा अधिक तपास अजून सुरू असल्याची माहिती डोंबिवली चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.