पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या सोईसाठी मोशीमध्ये महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. गायरान जमिनीवर १५ एकर परिसरामध्ये आठ मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. या रुग्णालयामुळे वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार असून, समाविष्ट गावांसह महापालिका हद्दीलगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या भागात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या होत आहेत. नागरीकरण वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, जुन्नर, मंचर, आंबेगाव या भागातील नागरिक उपचारासाठी शहरात येतात. हे रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल होतात. शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ७५० खाटांच्या वायसीएम रुग्णालयावर ताण येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्णसंख्या असल्याने अनेकदा रुग्णांना ताटकळत थांबावे लागते. वाहतूक आणि वाहनतळाची समस्या निर्माण होते. वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी मोशीत ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेत सहा ठेकेदारांनी सहभाग घेतला. यामध्ये तीन अपात्र, तर तीन पात्र झाले आहेत. यामधील दोघांनी १५ ते २० टक्के वाढीव दराने, तर एका ठेकेदाराने ९ टक्के वाढीव दराने निविदा भरली आहे. ९ टक्के वाढीव निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला काम दिले जाण्याची शक्यता आहे.
बाह्यरुग्ण विभाग, कान-नाक-घसा, नेत्र विभाग असेल. सीटी स्कॅन व एमआरआयची सुविधा असेल. शस्त्रक्रिया, अतिदक्षता, बालरोग अतिदक्षता, नवजात शिशू अतिदक्षता, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग व मानसिक रुग्णांचे कक्ष असणार आहेत. क्ष-किरण, सोनोग्राफी, बालरोग, मानसोपचार, त्वचारोग, स्त्रीरोग व श्वसन नलिकांचे विभाग, भाजलेले रुग्ण, डायलिसिस, विकृती शास्त्र विभाग, रक्तपेढी व १८० आसन क्षमतेचे उपाहारगृह असणार आहे. रुग्णालयातील संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशस्त वाहनतळ विकसित केले जाणार आहे. त्यामध्ये २७४ चारचाकी व २५० दुचाकी वाहनक्षमता असेल. चऱ्होली, मोशी, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी हा विभाग झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ जास्त आहे. या भागातील नागरिकांसाठी भोसरीशिवाय मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे मोशी रुग्णालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळतील. वायसीएमवरील ताण कमी होईल. स्थापत्य विभागातर्फे निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका