वृत्तसंस्था : T२० World Cup २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित गट अ सामना रविवारी, १५ फेब्रुवारीला कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार (India vs Pakistan ) आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पूर्वीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी त्यांचे आभार मानले. हा वाद १ फेब्रुवारीला सुरू झाला होता, जेव्हा पाकिस्तान सरकारनं भारताविरुद्ध न खेळण्याची घोषणा केली होती. आठवडाभराच्या गुप्त चर्चेनंतर शरीफ यांनी यू-टर्न घेत, सामना खेळण्याची परवानगी दिलीय. सोमवारी रात्री उशिरा अधिकृत घोषणेत आयसीसीनं स्पष्ट केलं की, टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी न झाल्याबद्दल बांगलादेशवर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. तसंच, २०३१ पूर्वी बांगलादेशला एका आयसीसी स्पर्धेचं यजमानपद देण्यात येणार आहे. ही सवलत मिळाल्यानंतरच पाकिस्ताननं भारताविरुद्ध सामना खेळण्यास संमती दिलीय. बांगलादेशनं भारतात सुरक्षा कारणास्तव प्रवास न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळं त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आलं होतं.

