ठाणे प्रतिनिधी : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसापूर्वी पार पडली होती, या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी गुरूवार दिनांक 26/09/2024 रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, तिरुपती काकडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे नोडल ऑफिसर आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच घोडबंदररोड परिसरातील नागरिक उपस्थित होते.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका व इतर प्राधिकरणांची यंत्रणा सातत्याने कार्यरत असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे व ही यंत्रणा यापुढेही अधिक गतिमानतेची काम करेल, या कामाची जबाबदारी ठाणे महापालिकेसह मेट्रो प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग हे सर्व समन्वयाने काम करत असून याबाबत महापालिका प्रशासन सातत्याने माहिती घेत आहे. तसेच नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विचार करुन त्या तातडीने सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे, यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने संबंधित प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे देखील प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केले.
घोडबंदर रोड अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात प्रकाश उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून लाईटस् बसविण्यात यावेत, तसेच रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत असलेली चेंबर्सची दुरूस्ती करणे, खड्डे तातडीने बुजविणे आदी मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या. याबाबत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.