नवी दिल्ली : मद्य खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने ‘दिल्ली लिकर बुकिंग’ हे नवीन मोबाईल ॲप सुरू केले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता घरबसल्या मद्याची ऑनलाइन बुकिंग करता येणार असून, दुकानांमधील गर्दी कमी करण्यास आणि डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, या सेवेत घरपोच मद्य वितरणाची सुविधा उपलब्ध नसणार आहे.
ग्राहकांनी ॲपवरून मद्य निवडून ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर संबंधित दुकानातून स्वतः जाऊन ऑर्डर घ्यावी लागणार आहे. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला क्यूआर कोड दिला जाईल. हा कोड दाखवून निवडलेल्या दुकानातून ४८ तासांच्या आत मद्य स्वीकारणे बंधनकारक असेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचे वय किमान २५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अबकारी नियमांनुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ लिटर व्हिस्की आणि १८ लिटर बिअर ऑनलाइन बुक करता येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा दिल्ली स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (डीएसआयआयडीसी) संचलित २०८ मद्यविक्री केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना विविध ब्रँड, उपलब्ध साठा आणि किमती घरबसल्या पाहता येणार असल्याने दुकानांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज कमी होईल. तसेच ऑनलाइन पेमेंट आणि डिजिटल नोंदीमुळे व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल. दिल्ली सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे मद्य खरेदीची प्रक्रिया अधिक वेगवान, सोयीस्कर आणि तंत्रज्ञानाधारित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

