मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. येत्या ६ जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी घरगुतीत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे २८ जानेवारीला निधन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर लगेच ३० तारखेला अजित पवार यांचा अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचदिवशी सोनगाव येथील कऱ्हा-नीरेच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यानंतर अजित पवार यांच्या दशक्रिया विधीची चर्चा होती. मात्र, तिसऱ्या दिवशीच सर्व विधी पार पडले असून पुढील विधी घरच्याघरीच पूर्ण होतील, असेही समजते.
कुटुंबीयांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता १०व्या किंवा १३व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही. या सगळ्यावर अजित पवारांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, पुरोगामित्व जपत तीन दिवसांतच सर्व विधी उरकल्याचे समजते.

