कल्याण : शिवसेना-भाजपवर विकास कामांच्या माध्यमातून नेहमीच टिकेची झोड उठविणारे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी महायुतीचा धर्म बाजुला ठेऊन लोकांच्या समस्येची बाजू घेऊन ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून पुन्हा शासनावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना-भाजप युतीत सहभागी व्हायचे असल्याने मागील तीन महिन्यांपासून गप्प असलेल्या आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुका पार पडताच, पुन्हा राज्य सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षाचे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे दुखणे या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणामुळे दूर झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावरून समाधानाने सुसाट प्रवास करत आहेत. हा समाधानाचा श्वास घेत असताना आता कल्याण-शिळफाटा या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने शिळफाटा रस्त्याचे नवेकोरे काँक्रीट रस्ते, दुभाजक फोडून तेथे अतिभव्य अवजड यंत्रणा खोदकामासाठी आणून ठेवली आहे. त्यामुळे या यंत्रणेमुळे आत्ताच सोनारपाडा, गोळवली भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे.
कल्याण-तळोजा मेट्रो रस्ते कामासाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मोकळा भूभाग आहे. जेथे वाहन कोंडी होणार नाही अशा ठिकाणी पहिले मेट्रोचे खड्डे आणि इतर कामे सुरू करावीत. जेणेकरून लोकांना त्रास आणि कोंडीत लोकांना अडकावे लागणार नाही. याचा कोणताही विचार न करता शिळफाटा रस्त्यावर डोंबिवलीकरांना दिसेल अशा सोनारपाडा, गोळवली या वर्दळीच्या ठिकाणी अवजड यंत्रणेतून शिळफाटा रस्त्यावर खड्डे मारण्याची कामे एमएमआरडीएने सुरू केली आहेत. मेट्रो आली, काम सुरू झाले. जगाला दिसले आणि याच काळात लोकसभा निवडणुका पण पार पडल्या. हा शोभेचा देखावा मनासारखा पार पडला आहे ना, मग आता शांत बसून उर्वरित भागात मेट्रोचे काम सुरू करा, असा कचकचीत टोमणा आमदार राजू पाटील यांनी कल्याण परिसराचे विश्वकर्माच आपण या अविर्भावात वावरणाऱ्या एका शायनर लोकप्रतिनिधीला अनुल्लेखून लगावला आहे. या विषयाची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.