ठाणे : लोकल रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि निर्धास्त व्हावा यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ‘खाकीतील सखी’ उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान छेडछाड, गैरवर्तन, त्रासदायक प्रकार किंवा इतर कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या अडीच वर्षांपासून सर्व रेल्वे स्थानकांवर सातत्याने सुरू आहे. या उपक्रमांतर्गत महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र संदेशवहन गट तयार करण्यात आला असून, त्यामध्ये महिला प्रवासी छायाचित्रे, चित्रफिती आणि संदेशांच्या माध्यमातून थेट तक्रार नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारींवर लोहमार्ग पोलिसांकडून त्वरित दखल घेत आवश्यक कारवाई केली जाते. याशिवाय महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी १५१२ हा मदत क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिलांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अशा सुविधा वापराव्यात आणि कोणतीही संशयास्पद किंवा त्रासदायक घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिला प्रवाशांना थेट पोलिसांशी संवाद साधण्याचा विश्वासार्ह मार्ग उपलब्ध झाला असून, त्यांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळत आहे.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलिसांच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे महिला प्रवाशांना ‘खाकीतील सखी’ उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केवळ महिला सुरक्षेपुरतीच जनजागृती न करता आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीविरोधात सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले. अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महिलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी दुव्यांवर क्लिक करू नये, कोणालाही वैयक्तिक किंवा बँकविषयक माहिती देऊ नये आणि डिजिटल व्यवहार करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. एकूणच, ‘खाकीतील सखी’ उपक्रमाच्या माध्यमातून तांत्रिक सुविधा आणि प्रत्यक्ष पोलिस मदतीची सांगड घालत महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस प्रयत्न सुरू असून, या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

