मुंबई : अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचा एक आठवडा पूर्ण करून ९ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. पहिल्याच आठवड्यात ‘कांतारा: चॅप्टर १’नं ‘कांतारा’च्या कमाईचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ऋषभ शेट्टी स्टारर चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’चा पहिला वीकेंड धमाकेदार होता. या चित्रपटानं पहिल्याच वीकेंडला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यानंतर, हा चित्रपट ४०० कोंटीचा आकडा लवकरच पार करेल असं सध्या दिसत आहे.
‘कांतारा चॅप्टर १’ हा कन्नड उद्योगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’ यशच्या ‘केजीएफ: चॅप्टर २’ (१,२५० कोटी) च्या मागे आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’नं कमल हासनच्या विक्रम (४१३ कोटी) आणि ‘भूल भुलैया ३’ (४११ कोटी)चे रेकॉर्ड देखील मोडले. आता असे मानले जाते की, ‘कांतारा: चॅप्टर १’ हा २०२५ मधील पहिला १००० कोटी कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. एसएसीएनआयएलसी यांच्यानुसार ‘कांतारा: चॅप्टर १’नं भारतात ६१.८५ कोटींची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ४५.४ कोटी, तिसऱ्या दिवशी ५५ कोटी आणि चौथ्या दिवशी, रविवारी ६३ कोटींची कमाई केली. यासह, चित्रपटानं पहिल्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २२५.६२ कोटींची कमाई केली.