मुंबई : जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बतावणी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे ३.४० लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईत आरोपींकडून इतर सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. १६ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय किस्तुरा चौधरी यांना जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसरात फसवून दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही तपासणी व तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे आणि मुंढवा परिसरातून रमेश विजयकुमार जैस्वाल (४६) व निलेश चंद्रकांत घाग (३३) यांना अटक करण्यात आली.
आरोपी रमेश जैस्वाल याच्याविरोधात मुंबई, ठाणे व मिरा-भाईंदर परिसरात तब्बल ८१ गुन्हे दाखल असून, निलेश घागवर पाच गुन्हे नोंद आहेत. वाकोला, बोरीवली, कल्याण व डोंबिवलीसह सहा गुन्ह्यांतील दागिने व पुरावे या आरोपींकडून हस्तगत झाले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर आयुक्त परमजित सिंग दहिया यांच्या आदेशाने पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मेघवाडी विभाग संपतराव शंकरराव पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक इक्बाल शिकलगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि सुदर्शन पाटील, सपोनि विनोद लाड, सपोनि नागेश मिसाळ व पथकाने तपास करून आरोपींना गजाआड केले.