नवी दिल्ली : ‘एफआयएच’ (FIH) पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ पूर्वी भारतीय हॉकी वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारा निर्णय समोर आला आहे. भारतीय हॉकी संघाची जागतिक स्तरावर ओळख असलेली पारंपरिक निळी (ब्लू) जर्सी बदलून ती भगव्या (ऑरेंज) रंगात सादर करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या नव्या जर्सीचे अनावरण करताच क्रीडाप्रेमी, माजी खेळाडू आणि राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ऑगस्ट २०२६ मध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार विरेन रासकिन्हा यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, भारतीय संघाची ओळख ही नेहमीच ‘मेन इन ब्लू’ अशी राहिली असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, हॉकी इंडियाने गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकीच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले असले तरी जर्सीचा मूळ रंग बदलण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अनेक वर्षे अभिमानाने निळी जर्सी परिधान करून देशाचे प्रतिनिधित्व केल्याचे नमूद करत त्यांनी जगभरातील चाहते भारतीय संघाला निळ्या रंगातच पाहण्याची सवय असल्याचे सांगितले आणि जर्सीचा रंग बदलण्यामागील कारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जर्सीच्या रंगबदलाचा मुद्दा क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित न राहता राजकीय पटलावरही पोहोचला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना, खेळाडूंच्या जर्सीचा रंग बदलण्यापासून ते शिक्षण क्षेत्रातील बदलांपर्यंत विविध निर्णयांवरून केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्या विधानानंतर या विषयाला अधिक राजकीय स्वरूप प्राप्त झाले. वाढत्या वादानंतर हॉकी इंडियाने अधिकृत स्पष्टीकरण देत जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय व्यवस्थापनाने एकतर्फी घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या शिफारसीनंतरच हा बदल करण्यात आल्याचे सांगत, नव्या जर्सीबाबत संघातील कोणालाही आक्षेप नसल्याचा दावा करण्यात आला. उलट, खेळाडू या नव्या जर्सीत मैदानात उतरण्यास उत्सुक असल्याचेही हॉकी इंडियाने नमूद केले. दरम्यान, १९७५ मध्ये एकमेव हॉकी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला यंदा तब्बल ५१ वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेतेपद मिळवण्याची संधी आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी विश्वचषकात दमदार कामगिरी करण्याच्या तयारीत असून, नव्या जर्सीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष मैदानावरील भारताच्या प्रदर्शनाकडे लागले आहे.

