ठाणे : देशातील टपाल सेवेमध्ये वेगाने आधुनिकीकरणाची प्रक्रिया आत्मसात करणाऱ्या इंडिया पोस्टच्यावतीने आता लॉजिस्टिक्स क्षमतेत मोठी झेप घेतली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) ने नव्याने उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) नजीक सुमारे सहा एकर जमिनीचा तुकडा इंडिया पोस्टला देण्यात आला आहे. या जमिनीवर अत्याधुनिक लॉजिस्टिक्स हब उभारण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील उलवे येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे दक्षिण मुंबईपासून सुमारे ३७ किमी अंतरावर आहे. देशाच्या प्रगतीत तसेच शहराच्या वाढीत विमानतळे ही मुख्य केंद्र ठरत असतात. यामुळे नवी मुंबई परिसरात निवासी प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क, व्यावसायिक केंद्रे, हॉटेल्स आणि इतर सेवांची उभारणी सुरू झाली आहे. दरम्यान जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए) कडून इंडिया पोस्टला सहा एकर जमिनीवर देण्यात आली आहे. यावर इंडिया पोस्टचे लॉजिस्टिक हब उभे राहणार आहे. लॉजिस्टिक हब या प्रकल्पाचा उद्देश देशभरातील पार्सल्सचे वितरण अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवणे आहे. विशेषतः लघुउद्योग, शिल्पकार, खेळणी निर्माते, मातीचे कारागीर, लोहार आणि बांधकाम कामगार यांना त्यांचे उत्पादन सहजपणे वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. इंडिया पोस्ट आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक साखळी अधिक सक्षम करणार आहे. विमानतळाच्या अगदी जवळ या हबची उभारणी होत असल्याने, देशभरातील लघुउद्योग, शिल्पकार आणि कारागीर यांना त्यांच्या उत्पादनांच्या जलद वाहतुकीचा मोठा फायदा होणार आहे.