पुणे : विनापरवाना वाहन चालविणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूलिवंदन सणानिमित्त २५ मार्च रोजी तुकाई नगर सर्कल सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळून आली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, दोघांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी श्रावण शेवाळे यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पालकांविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ३, ५, १९९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त भीमराव टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलिस कर्मचारी दीपक गबदुले यांनी ही कारवाई केली.