नवी मुंबई : रोज बेलापूर-उरण प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता सिवूड्स दारावे-बेलापूर- उरण या मार्गावरील लोकल ट्रेन वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वे या मार्गावर २० नवीन लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरपासून या नवीन रेल्वे ट्रेन सुरु केल्या जातील.
ऑक्टोबरपासून या नवीन २० रेल्वे फेऱ्यांचा वेळापत्रकात समावेश होईल. नवीन वेळापत्रकात १० अप आणि १० डाउन अशा अतिरिक्त रेल्वे ट्रेनचा समावेश केला जाईल. यामुळे या मार्गावरील रेल्वे फेऱ्यांची संख्या ६० होईल. सध्या या मार्गावरुन ४० अप डाउन रेल्वे चालवल्या जातात. सध्या सिवूड्स, बेलापूर- उरण या मार्गावर दर एक तासाने रेल्वे धावतात. दुपारच्या वेळा गर्दी नसलेल्या कालावधीत ९० मिनिटांनी ट्रेन धावतात. या मार्गावरील प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे १-१ तासाने रेल्वे धावतात. दरम्यान, काही दिवसातच नवी मुंबई एअरपोर्टचे उद्घाटन होईल. एअरपोर्टजवळील तरघर रेल्वेचंही काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे नवी मुंबई एअरपोर्ट सुरु झाल्यानंतर या मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढेल. त्यामुळेच या रेल्वे सेवा वाढवण्याची शक्यता आहे. बेलापूर-उरण या मार्गावर जर रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या तर प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. त्यांना आधी रेल्वेसाठी १ तास वाट पाहावी लागायची. आता प्रवाशांना कमी वेळ वाट पाहावी लागणार आहे. १० अप आणि १० डाउन अशा २० रेल्वे फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. याचसोबत एअरपोर्टवर जाण्यासाठीही रेल्वेने प्रवास करता येणार आहे.