वृत्तसंस्था : महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे बालकलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंगेश देसाई, शशांक शेंडे,सिद्धार्थ जाधव हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकताच लोकमत फिल्मीबरोबर संवाद साधला. यावेळी त्याने महेश मांजरेकर आणि चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले. महेश मांजरेकर यांच्याबरोबरच्या बॉण्डिंगबाबत सिद्धार्थ म्हणाला, “ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस आहेत. त्यामध्ये काही दुमत नाही. मला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. मला बरं वाटतं की फिल्ममेकिंग किंवा या क्षेत्रातील काही शिक्षण घेतलं नाही. आपण काम करत-करत शिकत आलो आहे. प्रत्येक चित्रपटाच्यावेळी ते मला मार्गदर्शन करत असतात.त्यातूनच मी शिकत असतो”, असे म्हणत त्याने महेश मांजरेकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

