मुंबई/ ठाणे : मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ होत आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका नोकरदार आणि प्रवाशांना बसत आहे. उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील सेवा विलंबाने सुरू असल्याने रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. काही लांब पल्ल्याच्या गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. सांताक्रूझ, अंधेरी, पवई, विक्रोळीसह अनेक भागांत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातही मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी झाडे कोसळल्याने रस्ते अडले असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शिळफाटा–मुंब्रा मार्गावर कंबरेएवढे पाणी साचल्याने रस्त्यालगत उभी असलेली अनेक वाहने पाण्यात बुडाली, तर काही वाहने बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे शहरातही मुसळधार पावसामुळे हडपसर, सिंहगड रस्ता, कोथरूड, नांदेड सिटी, जंगली महाराज रस्ता आणि वारजेसह अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, राज्यभर पावसाचा जोर कायम असून बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी लाल इशारा, तर चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला या विदर्भातील जिल्ह्यांसाठी नारिंगी इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई किनारपट्टीवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज दुपारी सुमारे १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि मोठी भरती येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमार, पर्यटक आणि नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, रेल्वे सेवा आणि नागरिकांच्या हालचालींवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

