मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील(एमएमआर) मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी ४६२ कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून गुरुवारी हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी लोकांना आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे परिसरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गिकांच्या आधारे सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसाह्यातून हे हजारो कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबविले जात असून आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यातील काही प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तर काही मेट्रो मार्गांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने ४६१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ठाण्यातील गायमुख ते मिरा रोडमधील शिवाजी चौक दरम्यानच्या ९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी १० कोटी, काही दिवसांपूर्वीच तांत्रिक चाचण्या सुरू झालेल्या कासारवडवली- गायमुख मार्गासाठी १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. अंधेरी- दहिसर पूर्व मार्गासाठी ३७ कोटी ५० लाख, अंधेरी ते विमानतळ मार्गासाठी ३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.